Nojoto: Largest Storytelling Platform
jitendriyaoka1434
  • 74Stories
  • 13Followers
  • 963Love
    4.9KViews

जितू

  • Popular
  • Latest
  • Video
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White 

असे ही चूक माझी की तुझ्यावर प्रेम मी केले
तुझ्या प्रेमात खोट्या ठार होते आंधळी झाले 
तुझ्या जाळ्यात प्रेमाच्या पुरी मी अडकले होते
दगा देशील तू स्वप्नात ही ना वाटले होते

शपथ मी वाहिली होती तुला रे साथ देण्याची 
किती मी पाहिली स्वप्ने सुखी संसार करण्याची 
खऱे मी प्रेम केले पण तुला कळलेच ते नाही
मला फसवून जाताना तुला ना वाटले काही 

मनावर घाव झालेला कसा शब्दात सांगावा 
कसा विश्वास कोणावर पुन्हा मी सांग ठेवावा
जरी मी यत्न हा करते जुने विसरून जाण्याचा 
मला जाईल अवघड तोडणे तो बंध प्रेमाचा

परी विसरेन मी नक्कीच आता मागचे सारे 
नको काहीच खोटे या मनाला त्रास देणारे
पुन्हा सुरुवात हो करणार आता मीच सगळ्याची
नवी शोधून दुसरी वाट मी चालेन जगण्याची

©जितू #sad_shayari
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

घेईन रजा गावाला जाण्यासाठी
परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी
मी गावाला जाईन खूप काळाने
भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने

काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने 
घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने  
वाढेल करून मग गरम भाकरी भाजी 
देईल छानशी फळे खायला ताजी

फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी 
धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी
पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना 
ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना

स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या 
करतील मनाला आनंदित त्या साऱ्या  
जाईल मनाची निघून मरगळ सारी
लाभेल मनाला माझ्या नवी उभारी

©जितू #SunSet
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White माणूस एवढा क्रूर कशाने होतो
आपल्या कृतीने पशूसही लाजवतो 
संताप द्वेष वासना अनावर होते 
वासनेपुढे मग भान कशाचे नसते 

कळतात बातम्या रोज नव्या घटनेच्या 
तोडतात साऱ्या सीमा माणुसकीच्या 
सैतानी वृत्ती जणू मनी संचरते 
स्त्री मोठी अथवा बळी चिमुरडी पडते 

अधमांना ऐशा कठोर शिक्षा द्यावी
जाणीव चुकीची क्षणाक्षणाला  व्हावी
स्त्री म्हणजे केवळ शरीर ऐसे नाही 
स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही 

थांबवा प्रदर्शन सतत तिच्या देहाचे 
शोधावे मिळुनी समाधान प्रश्नाचे
सर्व स्तरांवर याविषयी चर्चा व्हावी 
थांबवण्या घटना ठोस योजना व्हावी

©जितू
  #sad_shayari
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White ही भारतभूमी असे आपली माता
मन हर्षित होते गीत तिचे हो गाता
हे भाग्य आपले जन्म मिळाला येथे
नांदले देव अवतार घेउनी जेथे

अवतरले होते येथे राघव सीता
पार्थास सांगती येथे माधव गीता
जाहले इथे जे संत महात्मे ज्ञानी
जगतास चांगला मार्ग दाविला त्यांनी

वाहतात येथे गोदा गंगा यमुना
धावतात साऱ्या सुपीक भूमी करण्या
तीरावर त्यांच्या पीक डोलते छान
देतात नद्यांना आईचा हो मान

बोलतात सारे जरी वेगळ्या भाषा
नांदते तरीही मनात एकच आशा
असतात जरीही भिन्न भिन्न ते वेष
जाणतो तरीही एक आमचा देश

©जितू
  #happy_independence_day
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

श्रीवल्लभा दत्तराया समर्था मनापासुनी मी तुला वंदितो
सेवा घडावी तुझ्या पावलांची असा भाव भोळा मनी दाटतो
डोळ्यांपुढे साजिरी ती दिसावी मला दत्त मूर्ती सदा सर्वदा 
मूर्ती तुझी दिव्य पाहून माझ्या मना शांतता खूप लाभो सदा

किर्ती जिच्या थोर पातिव्रत्याची त्रिखंडात साऱ्या असे गाजली 
आले त्रिमूर्ती यतीवेषधारी परीक्षा तपाची तिच्या पाहिली
केले तपाच्या बळे बाळ त्यांना यथायोग्य भिक्षा तिने घातली 
एकत्र होऊन शक्ती तिघांची तुझ्या दिव्य रूपात साकारली 

पायी खडावा जटाभार माथी शिरे तीन बाहू सहा शोभती 
कांती तुझी दिव्य वात्सल्य मूर्ती तुझी पाहता भक्त आनंदती 
संकेतमात्रे तुझ्या विश्व चाले त्रिखंडात सत्ता तुझी चालते
सांभाळिशी तू तुझ्या साधकांना जशी लेकरा माय सांभाळते

लागो मनाला तुझा ध्यास ऐसा तुझे नाम घ्यावे सदा सर्वदा
राहो तुझा हात डोईवरी या घडो चांगले वा असो आपदा
लागो न वारा अहंकार रूपी तुझ्या नाममात्रे कधीही मना 
राहो मनी नेहमी प्रेम भक्ती तुला दत्तराया असे प्रार्थना

©जितू
  #election_2024
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

एकदा करीन | पंढरीची वारी 
राम कृष्ण हरी || मुखी माझ्या 

विटेवरी उभा | भक्तांचा कैवारी 
कर कटेवरी  || ठेवोनिया 

मृदुंगाची गोडी | अंतरी लागते 
रिंगणी नाचते || विणा  माझी 

विठू माझा बाप | माय रखुमाई 
डोळ्यातून वाही || चंद्रभागा 

पायरीत मिळे | मनाला विसावा 
घडो तुझी सेवा || पांडुरंगा 

रात्र अन् दिस | भक्ती तुझी केली 
चरणी ठेवली || काया माझी 


✍🏻 सौ. संध्या भूपेंद्र पोटफोडे

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

स्थिती वाईट झालेली असे हो आज किल्ल्यांची 
जिथे आहेत पडली पाउले प्रत्यक्ष शिवबांची
चिरा प्रत्येक इथला ओरडूनी सांगतो आहे 
जरा देऊन ऐका कान जे तो बोलतो आहे

नका येऊ कुणी फिरण्यास केवळ मौज करण्याला 
असे इतिहास जो घडला इथे जाणून घ्या त्याला 
नका भांडू तुम्ही जातीवरूनी एकमेकांशी 
खरे शिवभक्त जे ना शोभते हे वागणे त्यांसी

किती हा टाकता कचरा तुम्ही किल्ल्यांवरी येथे
पहा हे ढीग प्लास्टिकचे किती जमतात हो येथे
पिती दारू इथे येऊन ही नतद्रष्ट ते काही 
कशी ना वाटले त्यांच्या मनाला लाज थोडीही

नका वागू असे रे घाण ही टाकू नका येथे
असे त्या मावळ्यांनी रक्त त्यांचे सांडले जेथे 
अरे राखा तुम्ही पावित्र्य या गडकोट किल्ल्यांचे 
जरा समजून घ्या हे दुर्ग होते प्राण राज्याचे

खुणा दिसतील येथे वैभवाच्या थोर त्यागाच्या 
कथा सांगेल माती नीट ऐका वीर योद्ध्यांच्या
कथा ऐका तुम्ही समजून घ्या इतिहास हा त्यांचा 
असे एकत्र या ठेवा तुम्ही आदर्श राजांचा

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

वेळ असे का कुणाकडे ऐकुन घेण्यासाठी 
आजकाल मी सतत राहतो सगळ्यांच्या हाती
साऱ्यांना मी हवाहवासा सारे वापरता
माझ्यावर अवलंबून तुम्ही बऱ्याचदा असता 

कोणी म्हणता वाट लावली सगळ्यांची मीच 
मला सारखे घेऊन बसता तरी  सदोदित
झोप येतसे डोळ्यांवरती तरी मला बघता
खेळ खेळता सतत कुणी ते संभाषण करता

नसे मला कुठलीच भावना भली बुरी काही 
तुम्ही मला जे काम सांगता करीत मी राही
करता वापर तुम्हीच माझा अनिर्बंध आता 
आणि तरीही मला सारखा दोष तुम्ही देता

तारतम्य बाळगा वापरा मला संयमाने 
खूप त्रास होईल तुम्हाला अती वापराने
तंत्र यंत्र हे कामासाठी जरुर वापरावे
त्याच्यामध्ये उगाच इतके अडकुन का जावे

मीच सांगतो वापर माझा जपुन करा थोडा 
तुटलेला संवाद वाढवा माणसांस जोडा 
शिका कराया वापर माझा जरा संयमाने 
समोर भेटा बोला जोडा नाती प्रेमाने

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची 
विनायकाला शिक्षा झाली दोन जन्मठेपेची 
जहाजामधे कोंबुन झाली पाठवणी कैद्यांची 
अंदमानचे कारागृह हे गुहाच ती मृत्यूची

जेलर तिथला बारी नामक महाभयंकर होता 
मनात नव्हते स्थान दयेला स्वभाव खुनशी होता 
काळकोठडी अशी जिथे ना प्रकाश वारा पुरता 
खराब किडके अन्न असे कैद्यांना खाण्याकरता 

छिलके कुटणे वळणे दोऱ्या शिक्षा कैद्यांसाठी 
गुरांपरी घाण्यास जुंपती तेल काढण्यासाठी 
कैदी कोणी काम न करता फटके पडती त्याला 
बेड्यांमध्ये शरीर जखडुन उभे ठेवती त्याला

पाण्याच्या विहिरींमध्ये तुकडा टाकुनि पावाचा 
पिता कुणी ते  त्यास सांगती धर्म भ्रष्टला त्याचा
विनायकाने बंद पाडले प्रकार सगळे असले 
धर्म असा ना भ्रष्ट होत हे पटवुन त्यांना दिधले

विनायकाच्या ठायी उत्तम लेखन प्रतिभा होती
कोठडीत ही सुंदर कविता लिहिल्या भिंतीवरती 
कैद्यांमध्ये फार विनायक प्रिय सर्वांना झाला 
पाहुनिया हे जेलर बारी खजिल शेवटी झाला

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

दारात आजही सडा फुलांचा पडतो
सोहळा नव्याने आठवणींचा घडतो 
ती पहिल्यांदा या घरात आली जेव्हा 
लावले तिने हे झाड फुलांचे तेव्हा 

मोगरा पाहता खुशित यायची स्वारी
आवडे तिला या गंध फुलांचा भारी
मी आजही जेव्हा सडा फुलांचा बघतो 
चेहरा तिचा मज फुलात साऱ्या दिसतो 

केसात माळता तिने फुलांचा गजरा
यायचा आमच्या गंध घराला हसरा  
मज दिसायची ती वनदेवीच्या वाणी
द्यायची रोज झाडास सकाळी पाणी 

ती गेली त्याला वर्षे काही झाली 
या घरास अवघ्या कळा उतरती आली 
पण बहर फुलांचा तसाच अजुनी आहे 
का गंध फुलांचा तिला शोधतो आहे

©जितू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile