आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता म्हणून नवरोबाला म्हंटल,दोन दिवस जरा फिरून येऊया, तर साहेबांच्या कामाचा व्याप एवढा की सणासुदीला पण सुट्टी नाही मग यावर्षी दिवळीही इकडेच.. गावीही नाही जमणार म्हणे जायला... मग काय मी अजूनच नाराज झाले. तशीच विचार करत बसले होते तर बाजूच्या काकू म्हणाल्या आम्हीही इथेच आहोत दिवाळीला आणि आपण जाऊया फिरायला.. नवरोबाही म्हणे जा मग या मज्जा करून. शॉपिंग आणि फिरणे अशा दोन्ही गोष्टी कराव्या म्हणून निघालो 'सपनो की नगरी,मुंबई'... मुंबई आणि लोकल ट्रेन जशा "दिया और बाती" किंवा "सुई आणि धागा" इतका घनिष्ठ संबंध आहे दोघींचा!!! मग आम्हीही शनिवार रविवार बघूनच गेलो होतो जेणेकरून लोकलला गर्दी जरा कमी मिळेल.मुंबई दर्शन करत करत अवकाळी पावसाची मजा घेत आम्ही परत येण्यासाठी चर्चगेट स्टेशनला आलो.. दादरहून ट्रेन पकडणार होतो आम्ही परतीची..साधारणपणे वीस मिनिटांचा प्रवास होता चर्चगेट ते दादर. शनिवार असल्यामुळे आणि त्यात गाडीचं सुरुवातीचं स्टेशन असल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. आम्ही ट्रेन मध्ये चढलो.. ट्रेन निघायलाही दहा मिनिटे वेळ होता.आमच्या बाजूला तीन मुलींचा ग्रुप बसला होता. माझे बाळ त्यांच्याशी मस्त खेळायला लागलं म्हणून त्याही मस्त हसत होत्या त्याच्याशी. तेवढ्यात त्यातल्या एका मुलीच्या फोन वाजला.. समोरून आई असावी बहुतेक तिची.. पण ही मात्र जोरजोरात डाफरत होती तिच्यावर,"तुला समजत नाही का? मी आता ट्रेन मध्ये बसलेय, अजून निघाली पण नाही ट्रेन आणि पोहचायला मला अजून दोन तास लागतील,पाऊस पण किती चालू आहे, मी किती भिजून दमून निघाली आहे.. तुमचं नेहमीचंच आहे.. असं वाटतं घरीच येऊ नाही"!!😢 एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला. मला ऐकायचं नव्हत पण ती इतकी जोरात बोलत होती की अर्ध्या लोकांना तर ऐकू गेलच असेल.विरार वसई कुठेतरी राहत असावी बहुधा एवढे दोन तास लागतात घरी पोहचायला म्हंटल्यावर. मला क्षणभर वाटलं कशी असतात आजकालची मुलं कशी बोलतात पटापट आईला, मग आठवलं मी पण अशीच चिडचिड करायचे आईवर लग्नाआधी😢.. खूप वाईट वाटलं स्वतःचाच राग आला. मनोमन आईची माफी मागितली. पण मग त्यातल्या एका मुलीने तिला विचारले,"का गं काय झालं? आज परत शोभेची बाहुली बनायचं आहे वाटतं घरी जाऊन!" मला क्षणभर उलगडलंच नाही काय बोलताय त्या मग हळूहळू समजलं की तिच्या आईने फोन वर सांगितलं की तिला बघायला पाहुणे येणार आहेत रात्री, तर घरी लवकर ये आणि तयार पण व्हावं लागेल येऊन... एव्हाना माझं बाळ त्यातल्या एकीच्या मांडीवर जाऊन बसलं होतं.. तेवढ्यात घोषणा झाली की ट्रेन पंधरा मिनिटं लेट निघेन कारण पावसाने ट्रकवर पाणी आल्यामुळे पुढच्या ट्रेन धीम्या गतीने सरकताय..